एका सुशिक्षिताची कैफियत
एका सुशिक्षिताची कैफियत : (^m^) (^j^) (मनोगते)
लहान मुलांचे वय वर्षे दोन/तीन पासून शिक्षणाचे माध्यम इंग्लिश केल्याने जाणवणारे दुष्परिणाम, ज्यांची व्याप्ती खूपच मोठी व गंभीर आहे ............
१) मुलांमध्ये मातृभाषे विषयी गोडी राहत नाही. त्यांना मातृभाषेतील लहानसहान शब्दही नीट येत नाहीत. त्याची नैसर्गिक मजा मुलांना अनुभवता येत नाही.
२) पालकांचा "घरी मराठी करून घेऊ, मातृभाषा तर आहे." हा विश्वास सार्थ ठरत नाही. मग काही वर्षांनी असे जाणवते की, लहान मुलांना विषय समजण्यात खूप अवघड जात आहेत. अतिरिक्त शिकविण्या लावूनही फारसा उपयोग होत नाही. मुलांना इंग्लिश मधून विषय समजत नाहीत. परिणामी मूल घोकंपट्टीवर जोर देते. आणि अभ्यास फक्त मार्कांसाठीच करायचा असतो हा संस्कार त्यांच्यात रुजतो. मुलांचे बालपण संपुष्टात येते. पालक आणि मुलांमध्ये तणाव निर्माण होतो.
३) मातृभाषेतील वर्तमानपत्रे, पुस्तके, कथा, कादंबऱ्या, बालनाट्ये, नाटके, बालसाहित्य, चित्रपट इत्यादी अनेक गोष्टी मुलांना कांटाळवाण्या वाटू लागतात. त्यात त्यांना रस वाटत नाही. पर्यायाने बाल रंगभूमीलाही नाटके मिळत नाहीत... त्यात काम करणारी मुले मिळत नाहीत.
४) 'ना घर का ना घाट का' अशी बऱ्याच मुलांची अवस्था होतांना दिसून येते. ना धड इंग्लिश येत ना मातृभाषा! येते ती 'मिग्लिश'!!
५) पैशाचा अपव्यय तर प्रचंड होतो. खास करून माध्यम वर्ग, कनिष्ठ मध्यमवर्ग, गरीब वर्ग तर पूर्णपणे भरडला जातो. CBSE /ICSE च्या नावाखाली तर वारेमाप फी आणि देणग्या घेतल्या जातात. त्या पैशाचा विनियोग शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यापेक्षा दिखावेगीरीवर अधिक केला जातो. संस्था चालकांच्या तुंबड्या भरल्या जातात. म्हणजे शाळा काढणे हा फक्त व्यवसाय झाला आहे. पालक मात्र पोटाला चिमटे घेऊन आयुष्यातील मौजमजा कमी करून मुलांना या शाळांमध्ये पाठवण्याची धडपड करतात. पण पदरात काहीच पडत नाही याची जाणीव काही वर्षांनी होऊ लागते.
अशा अनेक बाबी आहेत. सर्व मराठी ,गुजराती, हिंदी शाळांमध्ये शिशुवर्गापासून इंग्लिश हा एक विषय शिकविला जातो. हल्ली बऱ्याच घरांमध्ये संगणक / मोबाईल फोन /केबल असते. अनेक इंग्लिश वाहिन्या असतात. त्यामुळे इंग्लिशचा बाऊ करण्याची गरज उरलेली नाही. तसेच मातृभाषा जर पक्की असेल तर मूल कालांतराने कोणतीही परकीभाषा थोड्याशा प्रयत्नाने सहज शिकू शकतो.
वरील मुद्द्यांचा विचार करता काही तुरळक अपवाद सोडले तर बाकी सर्व घरांमध्ये इंग्लिश माध्यमाचा हा संघर्ष सुरु असतो. खरेतर लहान मुलांना काय सोपे जाते याचा विचार झाला पाहिजे.ही काही आपल्या अस्मितेची लढाई नव्हे वा आपल्या हारजीतीचाही प्रश्न नव्हे. प्रश्न आहे तो कोवळ्या वयात मुलांवर इंग्लिश माध्यमाचे ओझे लादायचे का ? यावर आपण गंभीरपणे विचार करणार आहोत का नाही ?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा