अध्यात्म आणि विज्ञान
विज्ञान आणि अध्यात्म ह्या दोहोत काही मूलभूत फरक आहेत. त्यामुळे या दोहोत तुलना करणे चुकीचे आहे. कारण तुलना फक्त समान गोष्टींमध्ये होते विजोड गोष्टींमध्ये नाही. कसे ते खालील मुद्द्यावरून स्पष्ट होईल... 1) जाणीव, निरीक्षण, चिंतन, प्रायोगिक परीक्षण, गणितीय पडताळणी इत्यादी सोपस्कारांमधून पार पडल्यानंतरच एखाद्या विचाराला विज्ञानात मान्यता मिळते. अध्यात्मात मात्र कल्पनेचे वारू चौखूर उधळत असतात. त्यामुळे वेगवेगळे तत्त्ववेत्ते वेगवेगळे-कित्येकदा परस्परविरुद्धही- विचार मांडतात. 2) निखळ सत्य हेच विज्ञानाचे गन्तव्य असते तर अध्यात्म, कल्पनेलाच सत्य मानते. 3) विज्ञानाला शब्दप्रामाण्य मुळीच मान्य नाही. एखादा विचार कितीही मोठ्या व्यक्तीने मांडलेला असो वा कोणत्याही ग्रंथात दिलेला असो, ठरावीक प्रक्रियेतून पार पडल्याशिवाय वैज्ञानिक जगात त्याला मान्यता मिळत नाही. अध्यात्माचे गाडे मात्र व्यक्तिमाहात्म्य वा ग्रंथमाहात्म्य यांचे संदर्भ घेतल्यावाचून पुढे सरकतच नाही. 4) विज्ञान प्रत्येक बाबतीत पुरावा मागते. उलट, अध्यात्म आणि पुरावा यांचा छत्तीसाचा आकडा आहे.' बाबावाक्यम् प्रमाणम् 'हाच तेथे मूलमंत्...