हिमालयीन फसवणूक



*पहाटे 3 वाजता हिमालयामधील सूर्योदय त्यात इडा पिंगला सुषमा नाडीबरोबर मुलाधारासह अर्धचंद्रमाचे रुप दिसते त्याला शंकराचे विश्व्ररुप ही म्हणतात* अशा शीर्षकाखाली एक व्हीडीओ क्लिप हल्ली व्हाट्सअॅप 'बाजारात' आलेली दिसते. यामध्ये सूर्योदय किंवा सूर्यास्त समयीचे एक सुंदर दृश्य चित्रित केले आहे. त्यात मध्यभागी सूर्य, सूर्याच्या भोवती प्रकाशमान अर्धवर्तुळ, त्या अर्धवर्तुळाच्या वरील टोकाला अजून एक सूर्य तसेच क्षितिजावरील दोन बाजूंना दोन सूर्य असल्याचा भास होतो आहे. 

अशा आयत्याच लाभलेल्या सुंदर दृश्याच्या व्हीडीओमध्ये लेगेच आपला 'देव', घुसवण्यात भारतीय मागे कसे राहतील? त्यात त्यांना इडा, पिंगला, सुषमा नदी, मूलाधार, अर्धचंद्र आणि शेवटी शंकराचे विश्वरूप दिसू लागले. आता याचे विश्लेषण करू या: 

१) सदर व्हीडीओ हा "हिमालयातील" पहाटे तीन वाजताचा आहे असा दावा केला आहे. परंतु हा व्हीडीओ हिमालयातील नसून स्वीडन या देशातील आहे. याची लिंक पुढील प्रमाणे ( https://www.youtube.com/watch?v=bjiq_8K_k8Q ). या १५.०४.२०१९च्या व्हीडीओखाली तो टाकणार्‍याने वर्णन देखील लिहले आहे ते असे: A sun dog (or sundog) or mock sun, formally called a parhelion (plural parhelia) in meteriology  is an atmospheric optical phenomenon that consists of a bright spot to one or both sides of the Sun. Two sun dogs often flank the Sun within a 22° halo. (यावरुन हे दिसून येते की वातावरणातील विशिष्ट परिस्थितीमुळे आणि सूर्य क्षितिजावर असताना असे दृश्य दिसू लागते - म्हणजे आपल्याकडे चंद्राला किंवा सूर्याला कधीतरी खळे पडलेले दिसते तसे). परंतु वरील पोस्ट टाकणार्‍याने अगदी लोणकढी थाप ठोकून दिली आहे की हा हिमालयातील व्हीडीओ आहे. या दृश्यात आसपास कुठेही हिमालय सोडून द्या, साधी टेकडी सुद्धा दिसत नाही. 
२) शिवाय अत्यंत टुमदार आणि पाश्चात्य पद्धतीची सुरेख घरे, प्रशस्त आणि सरळ रस्ते  हिमालयात कुठून आली असावीत याचा विचार सुद्धा पोस्ट टाकणार्‍याने केला नाही. 
३) बरे हिमालयात पहाटे ३ वाजता सूर्योदय कसा काय होऊ शकतो? भूगोलाची एवढी क्रूर थट्टा? 

Parhelian किंवा सन डॉग ही प्रचलित नावे असणार्‍या नैसर्गिक परिस्थितीला जोडून एवढ्या थापा मारणार्‍याला हे पक्के ठाऊक आहे की आपल्या देशात मेंदू गहाण ठेवणारे कसलेही प्रश्न कधीही विचारणार नाहीत, कसलीही शंका न घेता आंधळेपणाने आपल्या पोस्टवर विश्वास ठेवतील. एका पाश्चात्य व्हीडीओची उचलेगिरी करताना निदान बेमालूमपणे तरी करायची!  

कोणी कोणत्या देवा/धर्मावर श्रद्धा ठेवावी हा प्रत्येकाचं व्यक्तीगत प्रश्न आहे आणि तो प्रत्येकाचा अधिकार देखील आहे. परंतु एका विशिष्ट नैसर्गिक परिस्थितीमुळे निर्माण होणार्‍या दृश्यात आपला देव घुसवून त्याचा संबंध  इडा, नाड्या यांच्याशी जोडून आपण आपल्या श्रद्धेचे, पर्यायाने देवाचे हसे करून घेत आहोत आणि एक भारतीय म्हणून आपण अत्यंत बुरसटलेल्या युगात रहात असल्याचे जगाला दाखवून देत आहोत याचे भान देखील या लोकांना रहात नाही.
- उत्तम जोगदंड

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राणप्रतिष्ठा करताना आरसा आपोआप कसा फुटतो?

चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..?

हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?