चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..?



चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..! म्हणून गणपती बुडवायची पद्धत सुरु झाली...!🤔

मित्रांनो, शिवजयंती बंद पडणारे व गणेश उत्सवाचे जनक बाळ गंगाधर टिळक. यांनी गणपती बसविला. दहा दिवसांपर्यंत सभा-सम्मेलने घेतली. दहाव्या दिवशी बसवलेल्या गणपतीची पुण्यातून वाजत गाजत मिरवणुक निघाली. त्यात दर्शन खुले होते.
         

एका चर्मकाराने (चांभार) गणपती जवळ जाऊन चक्क मुर्तिला स्पर्श करुन दर्शन घेतले..!

मिरवणुकीतील सर्व ब्राम्हणांनी एकच बोभाटा केला... गणपती बाटला, गणपति बाटला म्हणून टिळकांवर खेकसायाला लागले.

"हे पहा, सर्वाना दर्शन खुले केले तर हे असे होते. धर्म बुडाला, चांभाराने धर्म बुडविला..!" 

तोपर्यंत मिरवणुक पुण्याबाहेर आली होती.

टिळक म्हणाले - "ओरडू नका. धर्म कशाला बुडू द्यायचा. त्यापेक्षा आपण या बाटलेल्या मुर्तिलाच विसर्जित करू (म्हणजे पाण्यात फेकून बुडवून टाकू...)

अश्याप्रकारे तो चांभाराच्या स्पर्शाने बाटलेला गणपती बुडवला गेला आणि तेंव्हापासून दरवर्षी गणपती बुडवायची पद्धत सुरु झाली!✍🏻

- डॉ. नरेंद्र दाभोळकर




*या दाभोळकरांच्या बदनामीकारक पोस्टला उत्तर... – उत्तम जोगदंड.*

आता तरी डाँ नरेंद्र दाभोलकरांना सोडा...!

हा दाभोळकर यांच्या नावाने केला जाणारा अपप्रचार आहे. पोस्टकर्त्याने दाभोळकरांनी हे विचार कोणत्या पुस्तकात, कोणत्या वर्तमान पत्रात, कोणत्या मासिक वा साप्ताहिकात लिहीलेले आहे किंवा कोणत्या भाषणात हा उल्लेख केलेला आहे त्याचा पुरावा द्यावा. सनातनी व्यवस्थेमध्ये आज पर्यंत हजारो वर्षे 'ध' चा 'मा' करणारी माणसं होऊन गेली, आजही आहेत व पुढेही राहतील. यांनीच संत तुकारामांना सदेही वैकुंठाला पाठवले. यांनीच हनुमानाला आकाशात उडतांना दाखवलं. संघोट्या हिंदुत्ववाद्यांच्या सडक्या मेंदूतून असे विकृत विचार सतत बाहेर पडत असतात. आपण त्यांच्या अपप्रचाराला बळी पडू नये, एवढेच खरे.

डाँ नरेंद्र दाभोलकर: विचार पेरणारा माणूस! त्यांनी त्यांच्या विचारातून कधीही कट्टरता, नास्तिकता किंवा भाषेची पातळी सोडलेली नाही. त्यांची पुस्तके, लेख, आॕडिओ, विडिओमध्ये अशी ओळही दिसणार नाही. विचारांची लढाई कशी लढावी याचा आदर्श ठेवणाऱ्या दाभोलकरांचा ही विचारांची लढाई आधीच हरलेल्या भ्याड शक्तींनी भेकडपणे गोळ्या घालून खून केला.

ह्या आधीही आणि नंतरही, दाभोलकरांच्या अनेक वाक्याचा विपर्यास केला गेला. तेवढ्यानेच भागले नाही म्हणून अनेक गोष्टी त्यांच्या नावावर खपवल्या जावू लागल्या. फेसबुक, व्हाटसअप सारखा सोशल मिडिया वाढला आणि हे प्रकार जास्तच वेगाने पसरु लागले. दाभोलकरांच्या विचारांची पुरेशी ओळख नसलेले, तर काही जाणिवपूर्वक दाभोलकरांना बदनाम करण्यासाठी पेरलेलं षडयंत्र आहे हे!  

ज्या भक्तांना अजून काही कट्टर विचार पसरवायचे असतील ते ते त्या त्या लोकांनी आपापल्या नावानीशी पसरवावे. काही दिवसांपूर्वी "होय, मी नास्तिकच" ही कविता असो किंवा आता गणपती विसर्जनामागची कथा...! या आधी सुद्धा एक 'निर्भीड' कविता दाभोलकर यांच्या नावाने सोशल मीडियावर खपवली गेली होती आणि त्यावरून सनातन्यांनी त्यांच्यावर भरपूर तोंडसुख घेतले होते. नंतर ती कविता भीमराव सुर्वे नावाच्या व्यक्तीची होती असे आढळून आले होते.

गणपती विसर्जनाची पोस्ट वाचून काही प्रश्न उपस्थित होतात ते असे,
मला तरी ही पोस्ट खरी वाटत नाही. कारण:
१) पोस्टची सुरुवात 'शिवजयंती बंद पाडणारे...' असे टिळक यांना संबोधून झाली आहे. त्यावरून ती पोस्ट बनवणाऱ्याचा उद्देश कळतो.
२) गेल्या एक दोन वर्षांपासून फिरत असलेल्या या पोस्टमधील 'इतिहास' अज्ञात पोस्ट लेखक वगळता अन्य कोणालाही ज्ञात नाही किंवा आधी कुणीही तो सांगितलेला नाही.
३) ही घटना कोणत्या वर्षी, किती तारखेला घडली? नेमकी दहाव्या दिवशी मिरवणूक कशासाठी काढली जात होती? याचे स्पष्टीकरण या पोस्टमध्ये दिसत नाही.
४) या कथित घटनेआधी गणपती विसर्जन होत नव्हते, असा या पोस्टमधून अर्थ निघतो. त्याची चिकित्सा होणे गरजेचे आहे. त्या आधी मूर्तीचे काय केले जायचे?
५) एका वर्षी चांभाराने मूर्तीला स्पर्श केला म्हणून मूर्ती पाण्यात बुडवली असे मान्य केले तरी प्रश्न असा निर्माण होतो की, पुढील वर्षी चांभारांना मूर्तीच्या जवळ येण्यास बंदी घालण्या ऐवजी असा स्पर्श झालेला नसताना, मूर्ती बाटलेली नसताना ती दरवर्षी पाण्यात बुडविणे ब्राह्मणांनी का सुरू केले? 
६) त्या काळात जातीभेद अत्यंत क्रूरपणे पाळला जात होता हे खरे आहेच. त्यानुसार खरे तर त्या मूर्तीला स्पर्श करणाऱ्या चांभाराला ब्राह्मणांनी अत्यंत कडक शिक्षा करून समस्त चांभारांवर जरब बसवून पुन्हा कधी कोणी चांभार मूर्तीला स्पर्श करू शकणार नाही अशी परिस्थिती निर्माण केली असती. पण त्या ऐवजी, एकदा मूर्ती बाटली म्हणून पुढे दरवर्षी ती बुडावण्याचा मूर्खपणा ब्राह्मण करतील असे वाटत नाही.
७) शेवटी पोस्टखाली डॉ नरेंद्र दाभोलकर यांचे नाव टाकून या पोस्टला सच्चेपणा देण्याचा प्रयत्न करून एका दगडात दोन पक्षी मारायचा प्रयत्न केलेला दिसतोय. 

एकीकडे जातिभेदासाठी ब्राह्मणांना लक्ष्य करायचे आणि दुसरीकडे अंनिसला लक्ष्य करायचे. या पोस्टला कसलाही आधार नसल्याने सनातनी लोक दाभोलकर यांना खोटारडे म्हणणार, ब्राह्मण-द्वेषी म्हणणार. अंनिसवाले याचा बचाव करण्यासाठी धडपडणार. असा हा कावा आहे. दाभोलकर कधीही अशा गोष्टी पुराव्याशिवाय सांगत नसत हे लक्षात ठेवावे. गणपती कृत्रिम तलावात विसर्जित करण्याविषयी जी चळवळ दाभोलकरांनी उभी केलेय, त्याबाबत त्यांनी अनेक ठिकाणी लिहलेय. पण या प्रसंगाचा उल्लेख कुठेही नाही. तेव्हा डॉ नरेंद्र दाभोलकरांच्या नावे काही फाँरवर्ड करण्याआधी जवळच्या महा.अंनिस कार्यकर्त्यांचे मत तरी विचारात घ्या, आणि डॉ दाभोलकरांच्या बदनामीच्या षडयंत्रात सामील होवू नका!

तरी, अशा पोस्ट्स, कविता येतात तेव्हा त्याची तर्काच्या आधारावर तपासणी करणे, ज्याने ही पोस्ट पाठवली त्याच्याकडे पुरावे मागणे आवश्यक आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राणप्रतिष्ठा करताना आरसा आपोआप कसा फुटतो?

हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?