संस्कृत संगणकीय भाषा?

संस्कृत ही संगणकीय भाषा आहे. असे संगणक युग राजीव गांधी यांनी भारतात सुरु केल्यापासून ते आजपर्यंत सतत संस्कृत भाषेचे अभिमानी प्रचार करत आहेत.

यासाठी ते प्रामुख्याने इंग्रजी भाषेतील दोष ठळकपणे दाखवतात.
उदा.
Knight, knife मधे k चा उच्चार होत नाही, वगैरे.
इंग्रजी भाषेत केवळ पाच स्वर आहेत व त्या स्वरांचे उच्चार वेगवेगळ्या शब्दात वेगवेगळे होतात.
जसे
Go गो
 To टू
वगैरे.

पण केवळ एवढ्यापुरते त्यांचे समाधान होत नाही. म्हणून भारतीय भाषांमधे केवळ आणि केवळ एकमात्र संस्कृत हीच भाषा कशी संगणकीय आहे हे सांगत, अप्रत्यक्षपणे मराठी, कानडी, गुजराती, तेलुगू, मल्याळम, तामिळ, आसामी, हिंदी, बंगाली, उर्दू, उडिया, कोंकणी या व इतर भारतीय भाषा देखील कशा संगणकीय नाहीत, परिणामी संस्कृत पेक्षा कमी दर्जाच्या आहेत, हे सांगितले जाते.

यासाठी पाणिनीच्या व्याकरणाचा आधार घेतला जातो.  म्हणजे पाणिनीने व्याकरणात वेलांटी, उकार वगैरेंचे लिखित व त्या लिखितावरुन उच्चार करण्याचे जे दंडक घातले आहेत, त्याचा आधार घेतला जातो व अशी मांडणी केली जाते की, लिखिताचा अर्थ बदलत नाही.
उदा
सरस्वती लिहिले की त्याचा अर्थ सरस्वती असाच होतो आणि वेलांटी, उकार पहिला ऐवजी दुसरा किंवा दुसरा ऐवजी पहिला केला की लिंग , वचन बदलते. म्हणजे स्त्रीलिंगी, पुल्लिंगी किंवा एकवचन, अनेकवचन बदलते. साहजिकच संगणकाला आदेश म्हणजे कमांड देणे किंवा संगणकीय हार्डवेअर, साँफ्टवेअर प्रोग्राम करणे हे संस्कृत मधेच सर्वात जास्त सोपे आहे.
वरून दर्पोक्ती करून सांगितले जाते की अमेरिकेच्या नासाने पण  हे मान्य केले आहे.
त्यामुळे ऐकणारे जे असतात त्यांना संस्कृत म्हणजे दिव्य आहे असे वाटू लागते.
पण वास्तविकता काय?

आपण संस्कृत मधील काही शब्द बघूया.
ख म्हणजे आकाश
ग म्हणजे गमन करणे, जाणे
आकाशातून गमन करतो तो खग
खग म्हणजे पक्षी.
पण गेली शंभर वर्षे आकाशातून पक्षांबरोबर विमान पण गमन करते.
मग संगणकाला कसे कळणार
खग म्हणजे पक्षी की विमान.

हा मुद्दा लष्करी संगणाकामधे खूप महत्वाचा आहे.

पंकज
पंक म्हणजे चिखल
ज म्हणजे जन्मणे
चिखलात जन्मते ते कमळ
म्हणून पंकज म्हणजे कमळ.

आता चिखलात गांडूळ पण जन्मते त्याचे काय करायचे?

नीर म्हणजे पाणी
ज म्हणजे जन्मणे
पाण्यात जन्मते ते कमळ
म्हणून नीरज म्हणजे कमळ
मग मासे पण पाण्यात जन्मतात.

मग संगणकाला संस्कृत शब्दाचा नेमका अर्थ कळणार कसा?

संस्कृत मधल्या संधी समासाचे हे गोंधळ आहेत.
एक गंमतीदार उदाहरण पाहू.
पर म्हणजे दुसरा, परका वगैरे
कर म्हणजे हात
परकर म्हणजे दुसऱ्याचा हात म्हणायचा का?
बायका परकर घालतात.
म्हणजे काय?
परकर हा संधी नसून स्वतंत्र शब्द आहे. म्हणून संस्कृत व्याकरण मराठी मधे चालवू नये.

पण तरीही सुषमा स्वराज यांनी संस्कृत दिनानिमित्त संस्कृत हीच एकमेव कशी संगणकीय भाषा आहे यावर जोरदार भाषण केले. त्यासाठी त्यांनी संस्कृत नाटकांचा आधार घेतला.
सुषमा स्वराज म्हणाल्या की,  संस्कृत मधे एक नाटक ( मला नाव आठवत नाही. ) असे आहे की, बाण लागून राजाचा खालचा ओठ कापला गेला आहे, त्यामुळे राजा प, फ, ब, भ, म ही अक्षरे बोलू शकत नाही. म्हणून संपूर्ण नाटक प,फ,ब,भ,,म या अक्षरांशिवाय उभे केले आहे.
हे खरोखरच नाटककाराचे कौतुक व कौशल्य आहे की पाच अक्षरांच्या उच्चराशिवाय नाटक लिहिणे.
संस्कृत काव्यात पण कवींनी अशा अनेक चमत्क्रुती केलेल्या आहेत.
पण यामुळे संस्कृत ही संगणकीय भाषा कशी ठरते?
कारण संस्कृतच्या मर्यादा वर नमूद केलेल्या आहेत.
खरतर जगातील सर्व भाषा या मानवनिर्मित आहेत आणि संगणक पण मानवनिर्मित आहे म्हणून जगातील सर्व भाषा संगणकीय आहेत.
एवढा साधा विनम्रपणा संस्कृत मध्ये नाही.

उलट गेल्या हजार वर्षात प्राकृत मधे वेगवेगळ्या क्षेत्रात, वेगवेगळ्या फाँर्ममधे प्राकृत साहित्य निर्माण झाले तेवढे संस्कृत मधे निर्माण झाले नाही.

गेली दोनशे वर्षे तर संस्कृत मधे साहित्य निर्मिती जवळपास बंद आहे.
पण संस्कृतचा अट्टाहास इतका आणि मराठीचा द्वेष इतका की
राम गणेश गडकरी यांचे
एकच प्याला
हे नाटक 1985 मधे मुलुंडच्या संस्कृत अभिमान्यांनी संस्कृत रंगभूमीवर आणले. आता तुम्ही म्हणाल , त्यात काय, अशी अनेक नाटके एका भाषेतून दुसऱ्या भाषेत अनुवादित झाली आहेत.
पण हे सांगायचे कारण असे की त्या प्रयोगाला मी हजर होतो आणि गडक-यांचे नाटक मराठी पेक्षा संस्कृत मधे अधिक खुलते अशी चर्चा कानावर पडली.

अजून एक उदाहरण देतो.
मला काँलेजला मराठी साहित्य या विषयात सावरकरांचे
जयोस्तुते हे गीत अभ्यासाला होते.
हे गीत जरी मराठी असले तरी ध्रुपद जयोस्तुते हे संस्कृत मधे आहे.
आता हे गीत शिकवताना आम्हाला असे सांगितले गेले की ध्रूपद संस्कृत मधे आहे म्हणून गीताला आगळाच डौल चढला आहे, कारण  संस्कृत ही डौलदार भाषा आहे, तशी मराठी नाही.

संस्कृतचा हा संस्कृत अभिमान आणि मराठी द्वेष इतका पराकोटीचा आहे की तो आजचा नाही तर बाराव्या शतकापासूनचा आहे.
विवेकसिंधू या मराठी ग्रंथाच्या प्रस्तावनेत देवगिरीच्या यादवांचे पंतप्रधान हेमाडपंत लिहितात की
" मी विवेकसिंधू या ग्रंथाची रचना मराठी मधे करतो कारण, मूढ म्हणजे मूर्ख , अडाणी मराठी जनांना संस्कृत कळत नाही म्हणून संस्कृतमधील ज्ञान मी मराठी जनांना समजण्यासाठी विवेकसिंधू मराठी मधे लिहितो.
वास्तविक संस्कृत ही देववाणी, वेदवाणी, अम्रुतवाणी, तेजस्वी भाषा आहे, तर मराठी ही काटेरी, कस्पटासमान भाषा आहे."

मराठीला तुच्छ लेखणे, मराठीचा द्वेष करणे हे बाराव्या शतकापासून आजपर्यंत चालू आहे आणि आता तर इतर भारतीय भाषेत पण हे वीष पसरु लागले आहे.
संस्कृत विरुद्ध मराठी हा गेली हजार वर्षे चाललेला संघर्ष आहे.

विवेकसिंधूच्या प्रस्तावनेला उत्तर श्री संत ज्ञानेश्वरांनी दिले आहे.
संस्कृत अम्रूतवाणी काय?

माझ्या मराठिचिये बोलू कौतुके
कि अम्रुतातेही पैजा जिंके
ऐसी अक्षरे रसिके मेळवीन ।।।

रिद्धी, सिद्धी या गणपतीच्या पत्नी

इये मराठिचिये नगरी
रिद्धी सिद्धी पाणी भरी
---ज्ञानेश्वर

विवेकसिंधूच्या प्रस्तावनेत संस्कृत ही देववाणी

संत एकनाथ विचारतात

संस्कृत जर देवे लिहिली
तर मराठी काय चोरापासून झाली?

लिळाचरित्रात चक्रधर स्वामी स्पष्ट आदेश देतात
संस्कृत बोलू नका, ऐकू नका, लिहू नका, वाचू नका
मराठी बोला, ऐका, वाचा, लिहा.

आणि हा आदेश खूपच महत्त्वाचा आहे.
कारण मराठी ही तुच्छ भाषा समजून संस्कृत ही ज्ञानभाषा मानली गेल्याने
मराठी भाषिक भास्कराचार्यांनी गणितावरील ग्रंथ मराठी मधे न लिहिला संस्कृत मधे लिहिला.

मराठी भाषिक सुश्रुताने शल्यचिकित्सा मराठी मधे न लिहिता संस्कृत मधे लिहिली.

अनेक मराठी भाषिकांनी काव्य, नाट्य मराठी ऐवजी संस्कृत मधे लिहिले कारण त्यांचा ठाम समज होता की मराठी तुच्छ आहे व संस्कृत ज्ञानभाषा आहे.

पण ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि संस्कृत भाषा बंद पडली.

आज कोणीही आपली मात्रुभाषा संस्कृत सांगत नाही.
म्हणून " ग्यानबाची मेख कोणाला कळलीच नाही " अशी म्हण मराठीत आली.

संस्कृत मधे कवी कसे खेळले आहेत हे पहा मग बोला
अशा वल्गना करणाऱ्यांना मी सांगतो की
संस्कृत नाटकतील स्री पात्रे मराठी मधे बोलतात.
 आज भाजी कसली करु?
वांग्याचे भरीत करु की तोंडली भरून करु
एवढेसुद्धा संस्कृत मधे बायको नव-याला विचारु शकत नाही.
कारण बायकांना संस्कृत शिकण्याचा अधिकार नाही.
त्यामुळे स्वयंपाकघरातील शब्दांना संस्कृत मधे शब्द नाही.
जयंत साळगांवकर म्हणतात मधुगोलक म्हणजे मोदक.
एखादा शब्द असेल.
मग भरीत, लोणचे, ठेचा, सागुती, कालवण, पोळपाट, खलबत्ता, कढई यांना संस्कृत मधे काय म्हणतात.

नवरा बायको संस्कृत मधे बोलू शकत नाही
की आई बाळाला संस्कृत मधे जोजवू शकत नाही.
कारण संस्कृत मधे अंगाईगीत नाही की लहान मुलांचे बडबड गीत नाही.

तरीही संस्कृत श्रेष्ठ आणि मराठी तुच्छ असे गेली हजार वर्षे आम्ही ऐकत रहायचे. तर मी म्हणतो मराठी श्रेष्ठ आणि संस्कृत तुच्छ.

रघुवीर लुकस जोशी म्हणतात तेच खरं
माझ्या  मराठीची गोडी
मला वाटते अवीट.

👆लेखक समीर साने

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राणप्रतिष्ठा करताना आरसा आपोआप कसा फुटतो?

चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..?

हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?