'दशक्रिया' चित्रपटाच्या निमित्ताने

'दशक्रिया' चित्रपटाच्या निमित्ताने त्या विधी आणि कर्मकांडांना छद्म वैज्ञानिक संदर्भ देऊन खऱ्याखोट्याची सरमिसळ करून लोकांना भ्रमित करणाऱ्या पोस्टचे केलेले हे मुद्देसूद खंडन -- जेट जगदीश. (^j^)

>>> मृत्यू हा माणसाला नेहमी भयप्रद आणि मयताच्या नातेवाईकांना दुःखदायक आणि सैरभैर करणारा असतो. अश्या शोकाकुल लोकांकडून मृतदेहाची नीट विल्हेवाट लावली जाणे शक्य नसते. त्यासाठी एक तरी माणूस असा लागतो जो तुमच्या भावभावनांशी निगडित नाहीये, ज्याने मृत्यू आणि त्या भोवतालचा कल्लोळ अनेक वेळा बघितला आहे म्हणूनच तो त्रयस्थपणे हे काम करू शकतो. तो एक माणूस म्हणजे क्रिया कर्म आणि दशक्रिया विधी करून घेणारा ब्राह्मण.

*खंडन : भावनांवर काबू ठेवून मृत्यू जीवनाचा अविभाज्य भाग आहे हे समजून घेतले तर जवळची व्यक्ती गेल्याचे दुःख जरी झाले तरी वास्तवाचा स्वीकार केल्याने दुःख हलके होते. मग यांत्रिक पद्धतीने विधी करणाऱ्या रोबो ब्राह्मणाला बोलवायची गरज नाही हे कळते. आणि कुठलेही विधी न करता प्रेताला अग्नीच्या स्वाधीन करून त्याची योग्य विल्हेवाट लावता येते.*

>>> अग्निसंस्कार करताना केलेल्या प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे. अग्नी भडकल्यावर मृताच्या शरीरातून नाकातोंडातुन वात (गॅसेस) बाहेर पडतो. आपले स्वरयंत्र हवेवर चालते.
बाहेर येणारा वात जर नीट रेग्युलेट नाही केला तर मृताच्या तोंडातुन आवाज येऊ शकतो. त्यातून निर्माण होणाऱ्या गैरसमजा बद्दल वेगळे सांगायलाच नको. नाकात बोळे घालणे आणि तोंडावर भाताचा पिंड ठेवणे हा क्रियाकर्माचा भाग का आहे ते ह्यातून कळते. अग्नी भडकल्यावर तो जर नियमित नाही केला तर मोठी आग लागू शकते. म्हणून अग्निसंस्कार करणाऱ्या मृताच्या नातेवाईकाला मडके खांद्यावर घेऊन तीन वेळा चिते भोवती फिरवले जाते आणि मडक्याला वरून खाली अशी ३ भोके पाडली जातात. जेणेकरून पाण्याची धार सतत आणि नीट पडावी. उद्देश चिते भोवती ओले कोंडाळे करणे हा असतो.

*खंडन : माणूस मरतो म्हणजे काय, तर त्याचे हृदय बंद पडते पर्यायाने श्वास थांबतो. शालेय विज्ञानात 'कोणताही पदार्थ जागा व्यापतो' या गुणधर्मानुसार श्वास थांबल्यावर शरीरातील स्नायू आक्रसल्यामुळे तयार झालेली पोकळी भरण्यासाठी नाकाकानातून हवा आता शिरते. अग्निमुळे शरीर जळतांना ती हवा सहजी मोकळी होते. तिला रेग्युलेट करायची गरज नसते. शरीर जळतांना जे आवाज येतात ते एकतर ओल्या लाकडाच्या अर्धवट जळणाचे असतात वा हाडे फुटल्याचे, वायूचे नव्हे. मूळ लेखकाला हे शालेय विज्ञान माही नाही असे दिसते, म्हणून आपले छद्म विज्ञान तयार करून लोकांना भ्रमित करण्याचा हेतू स्पष्ट दिसतो. दुसरी गोष्ट मडक्यातील पाणी चितेभोवती पडल्यामुळे आग आटोक्यात राहाते, असे म्हणणे हा तर बालबुद्धीचाच आविष्कार म्हणावा लागेल. उलट प्रेत नीट जाळावे म्हणून चिंतेत रॉकेल, तूप तर कधीकधी टायर ही टाकतात. तेव्हा आग आटोक्यात ठेवण्यासासाठी मडक्याच्या पाण्याचे कर्मकांड ही तर शुद्ध लोणकडी थाप आहे.*

>>> चिता पेटवायचा आधी बोंब मारण्याचा उद्देश नुसताच लोकांचे लक्ष वेधणे हा नसून, शोकाकुल माणसाला त्याच्या भावनांना वाट मिळावी हा सुद्धा असतो. कारण ते मडके फिरवून झाल्यावर त्याच्या कडून त्याच्या आप्ताचे दहन करायचे सर्वात अवघड काम करून घ्यायचे असते. होळी पेटवल्यावर सुद्धा स्त्रियांकडून होळी भोवती पाण्याची धार ओतत फिरायची पद्धत आहे, तसेच बोंब मारायची पद्धत आहे. उद्देश एकच. फक्त त्याला विधी स्वरूपात आणले कि लोक करतात.

*खंडन : बोंब मारायचा उद्देश हा माणसात शिल्लक राहिलेला रानटीपणाचा अवशेष आहे. बाकी काही नाही.कारण आपली आवडती व्यक्ती मेल्यावर भरपूर रडून लोकांनी आपल्या भावनांना वाट करून दिलेली असते. तेव्हा दहनापूर्वी बोंब मारून त्याला अग्नी लावणे सोपे जाते असे म्हणणे हा खुळचटपणा झाला.*

>>> दहावा / तेरावा हे फक्त दुःख विसरून आता पुढे कामाला लागायचे ह्यासाठी असतात. मी स्वतः कित्येक घरांमध्ये तेराव्याच्या जेवणाला जमलेल्या नातेवाईकांना हास्य विनोद करताना पहिले आहे. दुःख विसरून पुन्हा आपल्या उद्योगाला लागायचे असते असा साधा उद्देश त्यात आहे.

*खंडन : दुःख तर माणसांनी दुसऱ्याच दिवशी गिळलेले असते, म्हणूनच आप्त दुसऱ्या दिवसापासूनच आपापल्या कामला लागलेले दिसतात आणि भोजनही वेळच्यावेळी करतात. 10वा/13वा हे 'लोक काय म्हणतील', या दाबावाखालीच केले जातात, हे जगजाहीर आहे.*

>>> काय मागत होता ब्राह्मण ह्याच्या बदल्यात मोबदला म्हणून? १ वेळचे जेवण आणि ऐच्छिक दक्षिणा. आज करन्सी (रुपया) मध्ये सगळे व्यवहार चालतात म्हणून तुम्हाला पैसा दिसतो, पण करन्सी ब्राह्मणाने तयार केली का ? ती तर क्षत्रिय राजाने तयार केली. ब्राह्मणाने तुमची सगळी कामे करायची आणि त्याबदल्यात मागायचे काही नाही ? तुम्ही वाटाल का तुमच्या दुकानातील किंवा शेतातील धान्य फुकट?

*खंडन : ब्राह्मण या बदल्यात काय मागतो याबद्दल केलेले वक्तव्य हास्यास्पद आहे. म्हणे फक्त एक वेळचे जेवण आणि ऐच्छिक दक्षिणा! अनेक ब्राह्मण काही हजार रुपायांसाठी अडून बसलेले पाहण्यात येतात. लोकांची शिधा आणि पैशासाठी अडवणूक करणे, चांदी सोन्याच्या वस्तू दान करण्याच्या नावाखाली हडपणे, यालाच का म्हणतात ऐच्छिक दक्षिणा!भरीस भर म्हणजे पोस्टकर्त्याने दुकान आणि शेतातील धान्य फुकट देते का कुणी अशी मूर्ख तुलना करून धार्मिक कर्मकांड आणि धंदा एकाच तागडीत मोजले आहे. म्हणजे नकळत त्याने ब्राह्मणांचा हा धर्माच्या नावाखाली चालू असलेला धंदा आहे, हे काबुल केलेय. यावरून पोस्टकर्ता हा किती लबाड व लुच्चा आहे ते कळते.*

>>> जर मृतांची नीट विल्हेवाट नाही लावली आणि ज्याच्या-त्याच्या मर्जीवर किंवा क्षमतेवर सोडून दिले सगळे....  तर रोगराई पसरेल. एखादवेळेस तुम्हाला माहित नसेल म्हणून सांगतो, आफ्रिकेतील लायबेरिया देशामध्ये ३ वर्षांपूर्वी इबोला ची प्रचंड साथ आली होती. ४५०० माणसे मेली. युनाइटेड नेशन्स ने सर्व मृतांना जाळावे असा प्रोटोकॉल इश्यू केला होता. कारण त्यांच्या असे लक्षात आले गाडलेले शरीर विघटित होताना प्रत्येक मृत शरीरातून अंदाजे ४० लिटर द्राव जमिनीत जिरतो. तो द्राव तुमच्या पिण्याच्या पाण्याच्या स्रोतात मिसळतो. केवळ ह्यामुळे इबोलाचा व्हायरस मरत नव्हता. अग्निसंस्कार सुरु केल्यावर साथ आटोक्यात आली. तुम्ही स्वतः गुगल सर्च करून  ह्या संदर्भात वाचू शकता.
मला कुणाच्याही रूढी परंपरांवर बोट ठेवायचे नाही आहे, पण हे सत्य आहे. वास्तविक अंतिमसंस्कारात अग्निसंस्कार फार अवघड आहे. पण अग्निसंस्कारातून शरीराची इतकी व्यवस्थित विल्हेवाट लागते कि अक्षरशः चिता भस्म अंगाला लावले तरी काही होत नाही.

*खंडन : शरीर विघटित होतांना 40 लिटर द्राव जमिनीत जिरतो ही पूर्णपणे अवैज्ञानिक थाप आहे. अग्नीसंस्कार हा निश्चितच चांगला प्रकार आहे, पण या दहनामुळे सुद्धा वायूप्रदूषण होते. शिवाय लाकडासाठी  जंगलतोड होऊन पर्यावरणाचा तोल ढळतो. त्यापेक्षा विद्युत दहन केव्हाही चांगलेच. उष्णतेने जंतू मारतात हे तर खरेच, पण त्यासाठी विधी आणि ब्राह्मणाची गरज नाही. वर दिलेल्या आफ्रीकेतील उदाहरणातही 4500 प्रेते नीट जाळणे महत्वाचे अधोरेखित केले आहे, तेही तिथे कोणतेही विधी न करता जाळले गेले. याचाच अर्थ प्रेताला अग्नी देण्यासाठी ना विधीची गरज लागते ना ब्राह्मणाची, हे लक्षात घेतले तरी पुरे.*

>>> दुसरे महत्वाचे, अग्निसंस्कार हा एकच संस्कार असा आहे कि जो मृताच्या नातेवाईकांना मृताला पूर्ण विसरायला लावतो. मृताची कुठलीच खूण समोर न उरल्याममुळे माणसे सगळे विसरतात. ह्या उलट बेरिअल मध्ये होते. जलस्रोत प्रदूषित होतात, जमीन कायमची निरबाड होते आणि माणसे विसरू शकत नाहीत. अनेक दिवस / कधीकधीतर महिनों-महिने शोकमग्न राहतात. कुत्र्यांनी प्राण्यांनी कबरी उकरून मृतदेह बाहेर काढून त्याची विटंबना केल्याची कित्येक उदाहरणे आहेत. शोक नसला तरी कबरींना संरक्षण म्हणून जात राहतात.पारशी लोकांमध्ये टॉवर ऑफ सायलेन्स ची पद्धत आहे. हि तर अत्त्यंत अशास्त्रीय पद्धत आहे. मुंबईमध्ये पक्ष्यांनी खाऊन टाकलेली सडलेली बोटे, नखे सापडल्याची उदाहरणे आहेत. मांजरींनी वगैरे तुटलेले पंजे वगैरे घरात आणून ठेवल्याची उदाहरणे आहेत! एकत्र राहणाऱ्या विशाल मानवी समूहाच्या हेल्थकेअर साठी हे योग्य आहे का ?

*खंडन : दहनविधिनंतर मृत मनुष्य पूर्ण विसरला जातो हे चूक आहे. दर वर्षी श्राद्धाच्या रूपाने त्याची आठवण उकरून काढली जाते. त्या निमित्त "धंदा" ही केला जातो. तसेच इतर धर्मातील प्रथांना नावे ठेवत अग्निसंस्कार कसा चांगला आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे आपल्यातील न्यूनगंडाला झाकण्याचा प्रयत्न करणे होय. कारण ब्राह्मणाला हे मनोमन माहीत असते की, कर्मकांड विराहितही अग्नीसंस्कार करता येतात. पण मग त्यांच्या पोटापाण्याचे काय ? म्हणून आत्मा, पुनर्जन्म, मृताच्या इच्छा आकांक्षा  अशा खोट्या कहाण्या रचून सामान्यांच्या माथी मारणे त्याला भाग होते. जेव्हा माणूस लोकांना उल्लू बनवतो तेव्हा त्याचे एक मन त्याला खात असते. त्यामुळे त्याच्याशी मनात एकप्रकारे न्यूनगंड तयार होतो. त्यातून मग तो आमचेच विधी आणि कर्मकाण्ड कसे शास्त्रीय आहेत हे पटवून द्यायाचा प्रयत्न करू लागातो. त्यासाठी तो छद्म विज्ञानाचा आधार घेतो.*
*म्हणूनच ह्या सगळ्या प्रथांपेक्षा देहदान करणे केव्हाही चांगलेच. त्यामुळे आपल्या मृत्यू नंतरही आपण कुणाला त्वचा, डोळे, हृदय, यकृत, मूत्रपिंडे इत्यादी अवयव दान केल्यामुळे अनेकांना नवीन जीवन मिळणार असते. तसेच त्यानंतरचे शरीरही वैद्यकीय विद्यार्थ्याना अभ्यासासाठी उपलब्ध करून देऊन आपण मेल्यावरही मानवाच्या प्रगतीला हातभार लावू शकतो. म्हणून देहदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे.*

>>> शेवटी मयताच्यावेळी ब्राह्मणाला बोलवायचे कि नाही हा ज्याचा-त्याचा पूर्ण वैयक्तिक प्रश्न आहे. शिकलेल्या सावरलेल्या लोकांनी मृत्यू हे अंतिम सत्य आहे हे मान्य करून डोके शांत ठेवून करावे अंत्यसंस्कार आपल्याला हवे तसे. इतर कुणालाही त्याचा त्रास होणार नसेल तर हवा कशाला ब्राह्मण ?पण बघा - साधा आजारी नातेवाईक दवाखान्यात नेल्यावर डॉक्टरला मारहाण करणारा समाज आहे आपला. शांत राहून जवाबदारीने अंतिम संस्कार करणे फार 'दुर की बात'. -- मनोज गांगल

*खंडन : म्हणजे एका बाजूने ब्राह्मणाची गरज नाही असे स्वतःच कबुल करायचे आणि दुसऱ्या बाजूने प्रेतसंस्कारातील कर्मकांडाची भलामणही करायची असा ढोंगीपणा आहे. आणि कहर म्हणजे आपल्याच समाजाला 'डॉक्टराला मारहाण करणारा समाज' संबोधून पूर्ण समाजाच्या संस्कृतीचे धिंडवडे काढून त्याची नाचक्की करण्याचा अनुदारपणाही लेखकाच्या अंगी पुरेपूर मुरला आहे, असे दिसते.*

*एकूण काय तर कर्मकांडांना छद्म वैज्ञानिक आधार देत आमचा धर्म आणि त्यातील कर्मकांड कसे वैज्ञानिक आहेत हे दाखवण्याचा आटापिटा त्याच विज्ञानाला तुच्छ लेखत करण्यात हा 'मनोज गांगल' नावाचा लेखक दांभिक आणि लबाड ब्राह्मण असल्याचे दिसते. तसेच त्याची ही पोस्ट फॉरवर्ड करणारेही अस्मिता सुखावल्यामुळे विचार न करता 'सुरवातीला ह्या प्रथांच्या मागे काही वैज्ञानिक कारण असेल आणि नंतर ते फक्त कर्मकांड झाले', असे समजून आपलेही अज्ञान प्रकट करत असतात.*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राणप्रतिष्ठा करताना आरसा आपोआप कसा फुटतो?

चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..?

हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?